चीटिंग कोविड
मानसी गोखले, रोहन बावडेकर, शर्मिष्ठा चौधरी
अनुवाद ः अमिता धर्माधिकारी
फक्त आठ मिनिटांचा छोटा कालावधी जीवन आणि मरण यातला निर्णायक घटक बनू शकतो. ज्या क्षणी रोहनच्या मानेवर त्या माणसाच्या शिंकेचे तुषार उडाले, त्या क्षणी ‘आता कठीण आहे,’ असे विचार त्याच्या मनात तरळले. आपल्या घरातल्यांना याचा काही थांगपत्ता लागू द्यायचा नाही, असं त्यानं भले कितीही ठरवलं, तरी मानसीला ‘मामा’ बनवणं शक्य नव्हतं, हे तो गेली चौदा वर्षं अनुभवत होता. मानसी नेहमी तिच्या ‘गट फीलिंग’वर विसंबून असायची आणि आत्तासुद्धा फार काही वाईट घडणार नाही, असंच तिचं अंतर्मन तिला सांगत होतं.
कोरोनाच्या साथीचा तो सुरुवातीचा काळ होता. कुठल्या तरी अनोळखी विषाणूनं जगावर हल्ला चढवून, बऱ्याच जणांचा जीव घेऊन जगात भीतीचं तांडव माजवलं होतं. लस अजून दृष्टिपथातही आलेली नव्हती. निरनिराळ्या उपचार पद्धती प्रायोगिक अवस्थेत सुरू होत्या.
रोहनला जिवंत ठेवण्याचं काम निरनिराळी यंत्रं करत होती, आणि इकडे मानसी, तिच्या तिन्ही मुलांना कोरोना विषाणूपासून वाचवायची धडपड करत होती. ती स्वत: त्याच्या विळख्यात अडकली, पण त्यातही आपल्या जोडीदाराला सुखरूप परत आणण्यासाठी तिच्या जिवाचा आटापिटा चालला होता.
सगळ्या शक्यता आजमावून जिवंत राहण्यासाठी केलेल्या धडपडीची, जोडीदाराच्या आणि कुटुंबाच्या प्रेमाची ही कहाणी आहे.